पुरंदर रिपोर्टर Live
दौंड:प्रतिनिधि
सन १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दौंड तालुक्याला भेट दिली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांनंतर पुन्हा एकदा देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी दौंडमध्ये येत आहेत. येत्या 30 सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यात ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सन १९८५ मधील दौऱ्याची आठवण अद्याप स्थानिक नागरिकांच्या मनात ताजी आहे. त्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून ॲड. अशोक बापूराव खळदकर यांना दौंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रचारार्थ राजीव गांधी यांनी दौंडमध्ये जाहीर सभा घेतली होती. ही सभा महत्त्वपूर्ण ठरली होती, कारण दौंडमध्ये प्रथमच एखाद्या पंतप्रधानाने प्रत्यक्ष येऊन जनतेला संबोधित केले होते.
आता जवळपास ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांची उपस्थिती दौंड तालुक्यात अनुभवायला मिळणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभाचा सोहळा भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस येथे आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले असून, दौंड तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
ग्रामविकास विभागाच्या या महत्त्वपूर्ण अभियानाच्या उद्घाटनासाठी निवडण्यात आलेल्या स्थळाची पाहणी नुकतीच पूर्ण झाली आहे. या पाहणीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रमस्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. प्रशासनाकडून सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते.
पंतप्रधानांचा दौरा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. भीमा कारखान्याजवळील कार्यक्रम स्थळावर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार असून, त्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विकास धोरणांचा थेट लाभ पंचायत स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याने, मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या शुभारंभाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्थानिक आमदार राहुल कुल यांनी या पार्श्वभूमीवर भावना व्यक्त करताना सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी दौंड तालुक्यात येत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामविकास अभियानाच्या शुभारंभाचे संयोजन दौंड तालुक्याला दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानतो,” असे ते म्हणाले.
दौंडमध्ये पंतप्रधानांचा हा दौरा केवळ एक शासकीय कार्यक्रम न राहता, ऐतिहासिक वारसा आणि नवीन विकासदृष्टी यांचा संगम ठरणार आहे. यामुळे तालुक्याच्या इतिहासात ३० सप्टेंबरचा दिवस विशेष ठरणार असून, चार दशकांपूर्वी राजीव गांधींनी घडविलेल्या परंपरेचा वारसा आता मोदींच्या उपस्थितीने उजळणार.
दौंडच्या इतिहासात 30 सप्टेंबर हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. चार दशकांपूर्वी राजीव गांधींनी सुरू केलेल्या परंपरेचा वारसा आता नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उजळणार असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.


0 Comments